नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2021: भारत आणि चीन यांच्यातील एलएसीवरील सीमा विवादादरम्यान चीनच्या अतिक्रमणाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे. चीनने भूतानमध्ये चार नवीन गावे निर्माण केल्याचा धक्कादायक दावा ओपन सोर्स अकाउंट डेट्रास्फाने केला आहे. हे गाव डोकलामजवळ आहे जिथून भारताचा ‘चिकन नेक’ जातो. ही कथित गावे चीनने मे 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत बांधली आहेत. हा दावा सॅटेलाइट इमेजच्या आधारे करण्यात आला असून रिपोर्ट्सनुसार चीनने डोकलामजवळ भूतानच्या वादग्रस्त भागात ही गावे बांधली आहेत. हे चित्र समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
डेट्रास्फा यांनी ट्विट केले की, ‘डोकलामजवळील भूतान आणि चीन यांच्यातील वादग्रस्त जमिनीवर 2020-2021 दरम्यान बांधकाम सुरू असल्याचे दिसून आले आहे. हा नवीन कराराचा भाग आहे की चीनचे प्रादेशिक दावे लागू करण्याचा प्रयत्न आहे?
वृत्तानुसार, ही नवीन गावे डोकलाम पठाराच्या जवळ आहेत जिथे 2017 मध्ये भारत आणि चीन यांच्यात सामना झाला होता. यानंतर चीननेही या भागात रस्तेबांधणीचे काम पुन्हा सुरू केले होते. चीनचे हे पाऊल भारतासाठी विशेषतः चिंताजनक आहे, कारण भारत भूतानला परराष्ट्र धोरणाबाबत सल्ला देत आहे आणि सैन्याला प्रशिक्षणही देत आहे. याचा व्यापक भू-सामरिक प्रभावही पडेल असे मानले जाते.
काँग्रेसचा सवाल- मोदी सरकार चीनपुढे का झुकतेय?
मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेसने म्हटले आहे की, गेल्या 18 महिन्यांत मोदी सरकारने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे तसेच कैलास पर्वतरांगांमधील आपल्या अधिकाराशीही तडजोड केली आहे. पँगॉन्ग सरोवराच्या उत्तरेकडील तीरावर फिंगर 4 वरून फिंगर 3 वर जाऊन मोदी सरकारने भारताची प्रादेशिक अखंडता कमी केली आहे. चीनने LAC च्या आत डेपसांग मैदानापासून Y-जंक्शनपर्यंतचा भारताचा प्रदेश का जोडला? चीनने गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स येथील वाय-जंक्शनपर्यंत एलएसीमधील भारताचा भूभाग का काबीज केला?
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे