पुणे: शिरूर तालुक्यातील नागरगाव येथे मंगळवार (दि.१९) ला सायंकाळी उस तोडणी करताना कामगारांना बिबट्याची ३ पिल्ले आढळली.शेतकरी कांतीलाल धुमाळ यांच्या शेतात ही ३ पिल्ले निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती ताबडतोब शिरूर वनविभागास कळविली.
शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माणिकडोह बिबट बचाव केंद्रास यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर माणिकडोह बिबट बचाव व निवारा केंद्राचे प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख व त्यांच्या टीमने तातडीने टीमसह नागरगाव येथे दाखल झाली. त्यांनी बछड्यांची तपासणी करून त्यांना पाहणी मोक्रोचिप लावली.
डॉ.देशमुख व त्यांच्या टीमने या पिल्लांना तिथेच आईकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्या जागेवर कॅमेरा ट्रॅप लावून डॉ देशमुख यांच्या टीमने ५०० मीटर अंतरावर थांबून निरीक्षण केले.
सायंकाळी ६.३० वाजता मादी तिथे आली. ६.४३वाजता पहिले पिल्लू नेले. त्यानंतर ७.४३वाजता दुसरे व ७.५३ वाजता तिसरे पिल्लू घेऊन गेली. रात्री ८ वाजेपर्यंत बिबट्याची तीनही पिल्ले त्यांच्या आईच्या कुशीत परत विसावली.
यात एक नर व दोन मादी पिल्लू असल्याची माहिती डॉ.देशमुख यांनी दिली.माणिकडोह बिबट बचाव केंद्राने आतापर्यंत ७३ बिबट पिल्लू आईच्या कुशीत दिली आहेत.
तर या कामी वनविभागाचे वनपाल प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक भानुदास शिंदे, वन विभागाची शिरूर रेस्क्यु टीम व सुधीर शितोळे, शरद गदादे,सुनील कळसकर,गोविंद शेलार व ग्रामस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.