आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस”, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई, 29 डिसेंबर 2021: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता देखील काल अतिशय गोंधळात झाली. विधानसभेत आणण्यात आलेल्या आणि मंजूर करण्यात आलेल्या विद्यापीठ दुरुस्ती विधेयकावरुन जोरदार खडाजंगी झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. हे विधेयक आणण्याचं आणि घाईघाईनं मजूर करण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारनं केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लोकशाहीचा सर्वात काळा दिवस

फडणवीस म्हणाले, “आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुटं सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे हे आज सिद्ध झालं. विधानसभेत विद्यापीठाच्या कायद्यावर चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक, ठरवून चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेऊन चर्चा न करता, हे विधेयक मंजूर करून घेण्याचं पाप आज सरकारने केलं आहे. दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सहभागी असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.”

विद्यापीठांवर कब्जा करण्याचा प्रयत्न –

याचबरोबर “ आमचे आमदार आशिष शेलार यांनी जो आरोप लावला होता, की यांना विद्यापीठाच्या जमिनी बळकवयाच्या आहेत. आता याबाबत आम्हाल देखील सत्यता वाटायला लागलेली आहे की ज्या प्रकारे विद्यापीठांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत आणि विद्यापीठांमध्ये मनमानी लोक नियुक्त करून घेण्याचे सगळे अधिकार, सगळ्या प्राधीकरणावर सरकारची सरशी कशी होईल, असा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि खरं जर पाहीलं तर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्या पूर्ण विरोधात हे विधेयक या ठिकाणी आलं आहे. देशामध्ये केंद्र सरकारसह सगळे कुलगुरू निवडीचा कायदा बदलत आहेत, विद्यापीठं स्वायत्त करत आहेत आणि महाराष्ट्रात प्रतीगामी पद्धतीने संपूर्ण कब्जा विद्यापीठांवर करून. म्हणजे मध्ये आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे टेंडरची कागदपत्र बोलावतात व त्यात ढवळाढवळ करतात. आता तर अधिकारच त्यांनी घेतला आहे. उद्या विद्यापीठाच्या खरेदीपासून तर विद्यापीठात कोणत्या अभ्यासक्रमाला मान्यता द्यायची इथपर्यंत आणि हे जे काही सगळे गुन्हे होत आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये आता पूर्ण अधिकार त्यांनी स्वत:कडे घेतले आहेत. ” असंही यावेळी फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा