पुणे, 6 जानेवारी 2022: प्रक्षोभक भाषण प्रकरणी पुणे पोलिसांनी कालीचरण महाराज याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले, तेथून त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आरोपीला छत्तीसगडमधील रायपूर येथून आणले होते.
हे प्रकरण 19 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील नातूबाग येथे झालेल्या कार्यक्रमाशी संबंधित आहे. ज्यामध्ये कालीचरण महाराजावर प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी शहर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कथित प्रक्षोभक भाषणाच्या वेळी मिलिंद एकबोटे, रमाकांत एकबोटे, दीपक नागपुरे, मोहन शेटे आणि कॅप्टन दिगेंद्र कुमार यांच्यावरही हाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या या आरोपींचा शोध सुरू आहे.
7 दिवसांची कोठडी मागितली होती
कालीचरणसह लोकांचा शोध घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच आवाजाचे नमुने घ्यावे लागतील आणि इतरांसोबत कालीचरण याने समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला का? या सर्व बाबींचा तपास व्हायला हवा, त्यामुळे पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. सरकारी वकील आणि बचाव पक्षाच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी कालीचरणला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
न्यायालयाबाहेर भाविकांनी घोषणाबाजी केली
कालीचरण महाराजचे भक्त महाराष्ट्रभर आहेत. कालीचरणची न्यायालयात हजारी लावल्याची माहिती मिळताच तरुण भाविक मोठ्या संख्येने तेथे पोहोचले होते. हा गोंधळ पाहता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र तरीही कालीचरण न्यायालयाच्या बाहेर येताच भाविकांनी घोषणाबाजी सुरू केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी या भाविकांना रोखले, त्यामुळे भाविक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे