नवी दिल्ली, 19 जानेवारी 2022: फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनची (FADA) मागणी सरकारने मान्य केल्यास अर्थसंकल्पानंतर दुचाकींच्या किमती कमी होऊ शकतात. ऑटोमोबाईल डीलर्स संघटना FADA ने दुचाकीवरील जीएसटी दर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची मागणी केलीय, जेणेकरून मागणी वाढू शकेल.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) ने म्हटलंय की दुचाकी हे लक्झरी उत्पादन नाही आणि त्यामुळं GST दर कमी करण्याची गरज आहे. FADA चा दावा आहे की ते 15,000 पेक्षा जास्त ऑटोमोबाईल डीलर्सचे प्रतिनिधित्व करतात ज्यांच्याकडं जवळपास 26,500 डीलरशिप आहेत.
28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्याची मागणी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यापूर्वी, FADA ने अर्थ मंत्रालयाला दुचाकीवरील जीएसटी दर 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती केलीय.
दुचाकींचा वापर चैनीच्या वस्तू म्हणून केला जात नसून सर्वसामान्य लोक दैनंदिन कामासाठी वापरतात, असं FADA म्हणाले. FADA पुढे म्हणाले, ” 28 टक्के GST सोबत 2 टक्के उपकर, जो लक्झरी उत्पादनांसाठी आहे, दुचाकी श्रेणीसाठी योग्य नाही.”
कच्च्या मालाच्या वाढीमुळे वाहनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि अशा स्थितीत जीएसटी दर कमी केल्यास किमतीतील वाढ रोखण्यात आणि मागणी वाढण्यास मदत होईल, असा संघटनेचा विश्वास आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे