दिवाळखोरी टाळण्यासाठी श्रीलंकेने सोनं विकण्यास केली सुरुवात, दिलं भारताचं उदाहरण

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022: दिवाळखोरीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी श्रीलंकेने सोनं विकण्याची स्थिती गाठलीय. श्रीलंका सोन्याची विक्री करून आपल्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला आधार देत आहे. श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने म्हटलंय की, कमी होत चाललेल्या परकीय चलनाच्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सोन्याच्या साठ्यातील काही भाग विकला आहे. श्रीलंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि सेंट्रल बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर डॉ. डब्ल्यू. विजेवर्धने यांनी नुकतेच एक ट्विट देखील केलं होतं ज्यात त्यांनी म्हटलंय की केंद्रीय बँकेचा सोन्याचा साठा कमी झाला आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, सेंट्रल बँकेचा सोन्याचा साठा $38.2 दशलक्ष वरून $17.5 दशलक्षवर आलाय.

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर निवार्ड कॅब्राल यांनी सांगितले की, श्रीलंकेने तरल विदेशी मालमत्ता (रोख) वाढवण्यासाठी आपल्या सोन्याच्या साठ्यातील काही भाग विकलाय.

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने वर्षाच्या अखेरीस चीनसोबत चलन स्वॅप (डॉलरऐवजी एकमेकांच्या चलनात व्यापार) केल्यानंतरच सोन्याचा साठा वाढवला.

इकॉनॉमी नेक्स्टच्या अहवालानुसार, असा अंदाज आहे की 2021 च्या सुरुवातीला श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेकडं 6.69 टन सोन्याचा साठा होता, त्यापैकी सुमारे 3.6 टन सोन्याची विक्री झाली आहे, आणि ते सुमारे 3.0 ते 3.1 टन शिल्लक आहे.

2020 मध्ये देखील केंद्रीय बँकेने सोनं विकलं. वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेकडे 19.6 टन सोन्याचा साठा होता, त्यापैकी 12.3 टन सोन्याची विक्री झाली. श्रीलंकेने 2015, 2018 आणि 2019 मध्येही सोने विकलं होतं.

गव्हर्नर काब्राल म्हणाले की, परकीय चलनाचा साठा वाढवण्यासाठी सोन्याची विक्री करण्यात आली. ते म्हणाले, ‘जेव्हा परकीय गंगाजळी कमी होते, तेव्हा आम्ही सोन्याची होल्डिंग कमी करतो. परकीय गंगाजळी वाढत असताना आम्ही सोनं खरेदी केलं. रिझर्व्हची पातळी USD 5 अब्जच्या वर गेल्यावर, केंद्रीय बँक सोन्याची होल्डिंग वाढविण्याचा विचार करेल.

काय म्हणाले सोन्याच्या घटत्या साठ्यावर श्रीलंकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ

डॉ.डब्ल्यू. सोन्याच्या विक्रीसंदर्भात विजेवर्धनेने डेली मिरर या श्रीलंकन ​​वृत्तपत्राशी संवाद साधला आहे. त्यांनी श्रीलंकेतील परिस्थितीची तुलना 1991 च्या भारताशी केली जेव्हा भारतानं स्वतःला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी सोनं गहाण ठेवलं होतं.

ते म्हणाले, ‘सोने हा एक राखीव साठा आहे ज्याचा वापर जेव्हा एखादा देश डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असतो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून वापरावा लागतो. त्यामुळं दुसरा पर्याय उपलब्ध नसताना सोन्याची विक्री संयमाने करावी. भारताने 1991 मध्येही आपले सोनं गहाण ठेवलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा