नवी दिल्ली, 31 जानेवारी 2022: राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वर्षातील पहिलं ग्रँडस्लॅम जिंकून इतिहास रचलाय. तो जगातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू ठरला आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 2-6, 6-7, 6-4, 6-4, 7-5 असा पराभव केला. हा सामना 5 तास 24 मिनिटं चालला.
मेदवेदेवने पहिले दोन सेट 6-2, 7-6 ने जिंकले. यानंतर नदालने पुनरागमन करत पुढील दोन सेट 6-4, 6-4 असे जिंकून सामना बरोबरीत आणला. यानंतर दोघांमध्ये पाचवा सेटही अतिशय रोमांचक झाला, ज्यामध्ये नदालने 7-5 असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं.
मेदवेदेव विरुद्ध नदाल
• पहिल्या सेटचा निकाल: 6-2 (डॅनिल मेदवेदेव)
• दुसऱ्या सेटचा निकाल: 7-6 (डॅनिल मेदवेदेव)
• तिसऱ्या सेटचा निकाल: 6-4 (राफेल नदाल)
• चौथ्या सेटचा निकाल: 6-4 (राफेल नदाल)
• 5व्या सेटचा निकाल: 7-5 (राफेल नदाल)
नदालने जिंकले सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम
नदालने हा सामना जिंकल्यानं त्याचं नाव इतिहासात नोंदलं गेलंय. जगातील सर्वाधिक 21 ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिला टेनिसपटू ठरलाय. या प्रकरणात त्यानं सर्बियाच्या नोव्हाक जोकोविच आणि स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला मागं टाकलं. फेडरर आणि जोकोविचने समान 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. फेडररच्या तंदुरुस्तीमुळं, लस पासपोर्ट आणि व्हिसाच्या वादामुळं जोकोविचला या ग्रँडस्लॅममध्ये भाग घेता आला नाही.
नदालने दुसऱ्यांदा पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद
नदालने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलंय. यापूर्वी 2009 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. नदालची ही सहावी ऑस्ट्रेलियन ओपन फायनल आहे. त्याला 6 पैकी फक्त 2 वेळाच फायनल जिंकता आली. नदाल 4 वेळा उपविजेता ठरलाय.
मेदवेदेवला होती दुसरे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी
त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन ओपनमधील डॅनिल मेदवेदेवची ही दुसरी अंतिम फेरी होती. सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यापासून तो हुकला. यावेळी त्याला पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी होती. त्यानं पलटी मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण रोमहर्षक लढतीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. मेदवेदेवने आतापर्यंत केवळ एक ग्रँडस्लॅम जिंकलाय. त्यानं गेल्या वर्षी यूएस ओपनमध्ये ही कामगिरी केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे