सीरिया, 4 फेब्रुवारी 2022: सीरियात ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला ठार मारल्याचा दावा अमेरिकेने गुरुवारी केला. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करून याची पुष्टी केलीय. बायडेन म्हणाले की, काल रात्री माझ्या आदेशानुसार अमेरिकेच्या सैन्याने जगासाठी मोठा दहशतवादी धोका असलेल्या इसिसच्या जागतिक नेत्याला ठार केलं.
बिडेनने ट्विटमध्ये लिहिलं की, “माझ्या सूचनेनुसार काल रात्री अमेरिकेच्या लष्करी दलांनी दहशतवादविरोधी ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल धन्यवाद, आम्ही इसिसचा नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी याला युद्धभूमीतून हटवलं आहे. आपल्या जवानांच्या शौर्यामुळं हा कुख्यात दहशतवादी नेता या जगात नाही.
बगदादीच्या हत्येनंतर संघटनेची कमान हाती घेतली
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सीरियामध्ये अमेरिकेच्या विशेष दलानं केलेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेट गटाचा प्रमुख मारला गेला. अमेरिकेच्या हल्ल्यात अबू बकर अल-बगदादी मारला गेल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 रोजी दहशतवादी संघटनेची सूत्रं हाती घेतलेल्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आलं.
बगदादी मारला गेला : अल कुरेशी
तथापि, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं की, ज्याप्रमाणे अमेरिकन सैन्य आल्यावर बगदादीने त्याच्या कुटुंबासमवेत स्वत:ला उडवून दिलं, त्याच प्रकारे अल-कुरेशीचा मृत्यू झाला.
13 जण ठार
प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, अमेरिकेचे विशेष सैन्य सीरियातील बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या भागात उतरले आणि त्यांनी एका घरावर हल्ला केला. दोन तास त्यांच्यात चकमक सुरू होती. सततच्या गोळीबार आणि स्फोटांमुळं तुर्कीच्या सीमेवर वसलेले अतमाह शहर हादरल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितलं. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या विशेष ऑपरेशन दरम्यान झालेल्या हल्ल्यात सहा मुले आणि चार महिलांसह 13 लोक मारले गेले.
सैनिकांच्या शौर्याला सलाम : बायडेन
बायडेन यांनी एका निवेदनात म्हटलंय की, त्यांनी अमेरिकन लोकांचे आणि त्यांच्या सहयोगींचे संरक्षण करण्यासाठी तसेच जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी या हल्ल्याचा आदेश दिला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पुढे म्हणाले, आमच्या सैनिकांच्या शौर्याला सलाम. आम्ही ISIS प्रमुख अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला ठार केलं. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले सर्व अमेरिकन सुरक्षितपणे त्यांच्या तळावर परतले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे