नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2022: टेलिव्हिजन जगतातून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. बीआर चोप्रा यांच्या प्रसिद्ध मालिका महाभारतात भीमाची भूमिका साकारणारे उत्तम अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांचं निधन झालंय. प्रवीण यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि या जगाचा कायमचा निरोप घेतला. प्रवीण कुमार यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसलाय. प्रवीण कुमार सोबती यांचं दिल्लीत निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर पंजाबी बाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रवीण कुमार यांनी चित्रपटांमध्येही केलं काम
महाभारत मालिकेव्यतिरिक्त प्रवीण कुमार यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना प्रभावित केलंय. पण महाभारत मालिकेत भीमाची भूमिका साकारून ते घराघरात प्रसिद्ध झाले. भीमाच्या व्यक्तिरेखेतील त्यांची भूमिका सर्वांना आवडली होती. प्रवीण यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते दु:खी झाले आहेत.
ऑलिम्पिक स्पर्धेतही घेतला भाग
प्रवीण त्यांच्या उत्कृष्ट उंचीसाठीही ओळखला जात होते. पंजाबचा रहिवासी असलेले प्रवीण 6 फूट उंच होते. अभिनयात येण्यापूर्वी प्रवीण खेळातही खूप सक्रिय होते. ते हातोडा आणि डिस्कस थ्रोचे खेळाडू होते. प्रवीण यांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत अनेक पदकं जिंकली होती. हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक जिंकलं. ऑलिम्पिकमध्येही त्यांनी दोनदा देशाचं प्रतिनिधित्व केलं.
अडचणीत गेले प्रवीणकुमार यांचे अखेरचे दिवस
महाभारतातील भीम प्रवीणकुमार यांचे शेवटचे दिवस संकटात गेले. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक संकटाचा सामना करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण हे अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात होते आणि त्यांनी सरकारकडं मदतीचं आवाहनही केलं होतं.
प्रवीण यांनी अगदी शंभर रुपयापासून एक्टिंग मध्ये आपलं करिअर सुरू केलं होतं. प्रवीण त्यावेळी ग्वाल्हेरमध्ये बीएसएफमध्ये होते. येथूनच त्यांच्या मनात करिअर बदलण्याचा विचार आला. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांना आणखी काही काम करायचं होतं आणि काही काळानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, जेव्हा त्यांना चित्रपटाची ऑफर आली. एक उत्कृष्ट अभिनेता आणि क्रीडा व्यक्ती प्रवीण आज आपल्यात नाही. प्रवीण यांच्या निधनाने सर्वांनाच दुःख झालं आहे.
राजकारणातही कमावलं नाव
महाभारत केल्यानंतर त्यांनी जवळपास 50 चित्रपट आणि टीव्ही शो केले. त्यांचा शेवटचा चित्रपट 2013 मध्ये आला होता, ज्याचं नाव Barbarik होतं. तथापि, नंतर त्यांनी अभिनय सोडून वजीरपूर येथील आम आदमी पार्टी (आप) मध्ये प्रवेश करून राजकारणात प्रवेश केला. नंतर प्रवीण कुमार ‘आप’ सोडून भाजपमध्ये आले. प्रवीण यांनी आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी केल्या आणि त्यात यश मिळवलं. प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करून त्यांनी नाव कमावलं, पण तरीही या अभिनेत्याचा शेवटचा काळ आर्थिक संकटात गेला. प्रवीण आता आपल्यात नाही, पण त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात ते सदैव जिवंत राहतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे