वर्धा, 10 फेब्रुवारी 2022: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आरोप सिद्ध झाले असून कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं आहे. मात्र या प्रकरणाचा निकाल आज न्यायालयात होणार आहे. या प्रकरणात महिला तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाजाच्या 19 दिवसांत दोषारोप पत्र पूर्ण केले. शिवाय, 28 फेब्रुवारीला या प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल 426 पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते.
आरोपीला 11.30 वाजता चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड उज्वल निकम, आरोपी पक्षाचे वकील ॲड भूपेंद्र सोने न्यायालयात हजर झाले. याचसोबत पीडितेचे आई-वडीलदेखील न्यायालयात दाखल झाले होते. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोप सिद्ध झाले असून या जळीतकांड प्रकरणात आरोपी दोषी ठरविण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता 3 फेब्रुवारीला 2020 ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररित्या जळालेल्या पीडितीचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे