अनिल अंबानी, RHFL वर सेबीने सिक्योरिटीज मार्केट मध्ये घातली बंदी, जाणून घ्या कारण

7

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2022: बाजार नियामक सेबीने शुक्रवारी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (RHFL), उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर तिघांवर रोखे बाजारातून बंदी घातली. कंपनीच्या निधीशी संबंधित कथित अनियमिततेबाबत सेबीने हे पाऊल उचललं आहे. बाजार नियामकाने RHFL चे अमित बापना, पिंकेश आर शाह आणि रवींद्र सुधाळकर यांना सिक्योरिटीज मार्केट मध्ये बंदी घातली आहे.

पुढील आदेश येईपर्यंत बंदी कायम

SEBI ने आपल्या अंतरिम आदेशात म्हटलंय की, “सेबीमध्ये नोंदणीकृत कोणत्याही मध्यस्थांशी, कोणत्याही सार्वजनिक सूचीबद्ध कंपनीशी किंवा भांडवल उभारणीत गुंतलेल्या कोणत्याही सार्वजनिक कंपनीच्या कार्यवाहक संचालक/प्रवर्तकांशी संबंध ठेवण्यास संस्थांना मनाई आहे.”
सेबीच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत.

100 पानांचा आदेश जारी

कंपनीच्या निधीशी संबंधित कथित अनियमिततेसाठी सेबीने 28 व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध 100 पानांचा आदेश जारी केला आहे. SEBI च्या तपासात, RHFL ने 2018-19 मध्ये ज्या पद्धतीने अनेक कर्जदारांना कर्जे दिली त्याकडं विशेष लक्ष दिलं गेलं.

SEBI आदेशात म्हटलं आहे की, Executive Director आणि CEO रवींद्र सुधाळकर आणि CFOs अमित बापना आणि पिंकेश आर शहा यांसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी कथित अनियमिततेला संचालक/नियामकां समोर आणण्याऐवजी कंपनीचे प्रवर्तक अंबानी यांच्यासोबत मिळाल्याचे निदर्शनास आलं.

रिलायन्स होम फायनान्स शेअर किंमत

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरच्या किमतीत (RHFL शेअर प्राइस) अलीकडं खूप दबाव दिसून आला आहे. या ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या सत्रात एका शेअरची किंमत 2.02 टक्क्यांनी घसरून 4.85 रुपये झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे