ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानात कोसळल्या प्रकरणी अनेक आयएएफ अधिकारी जबाबदार

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2022: भारताचे नि:शस्त्र सुपरसॉनिक क्षेपणास्त्र चुकून 9 मार्च 2022 रोजी प्रक्षेपित झाले. ते पाकिस्तानात पडले. या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. मात्र भारतीय हवाई दलाने या निष्काळजीपणासाठी हवाई दलाच्या एकापेक्षा जास्त अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल.


एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी व्हाइस एअर मार्शल आर के सिन्हा यांनी केली होती. या प्रकरणातील निष्काळजीपणासाठी त्यांना हवाई दलातील एकापेक्षा जास्त अधिकारी जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. हे अधिकारी मिसाईल स्क्वाड्रनचे आहेत. लवकरच या लोकांवर कडक कारवाई केली जाईल.


भविष्यात चूक होऊ नये म्हणून दक्षता


भविष्यात अशी चूक होऊ नये म्हणून मानक कार्यप्रणालीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे हवाई मुख्यालयाने सांगितले. 9 मार्च रोजी भारतीय सुपरसॉनिक क्षेपणास्त्र (निःशस्त्र) लाहोरपासून सुमारे 275 किमी अंतरावर पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. त्यामुळे एका कोल्ड स्टोरेजचे नुकसान झाले. मात्र, या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की, भारतीय क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये पडल्यानंतर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकलो असतो, पण आम्ही संयम दाखवला.


या प्रकरणाची सुरू होती उच्चस्तरीय चौकशी


चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पडलेल्या भारतीय हवाई दलाच्या क्षेपणास्त्राची उच्चस्तरीय चौकशी सुरू होती. या तपासात भारतीय ग्रुप कॅप्टनवर संशय असल्याची बातमी समोर आली होती. भारतीय हवाई दलाच्या तपासात आता ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत घुसले आणि मियां चन्नू नावाच्या ठिकाणी पडले. त्यावर पाकिस्तान सरकारने आक्षेप घेतला होता. मात्र, यापूर्वीही भारताच्या बाजूने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.


राजनाथ सिंह यांनी केले असे वक्तव्य


चुकून पाकिस्तानात पडलेल्या भारतीय क्षेपणास्त्रावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली होती. ते सभागृहात म्हणाले होते की, ही अनावधानाने घडलेली घटना खेदजनक आहे, आमची क्षेपणास्त्र यंत्रणा अतिशय सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. राजनाथ सिंह म्हणाले होते की, ही घटना सूचनांदरम्यान अनवधानाने क्षेपणास्त्र सोडण्याशी संबंधित आहे. मात्र या घटनेमुळे कोणतीही हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. सरकारने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा