मुंबई, २३ एप्रिल २०२२ : अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचा पाठ करण्याची घोषणा केली होती, मात्र आता वातावरण तापलं आहे. शिवसैनिकांनी तत्पूर्वी त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरू केली.
त्याचवेळी राणा दाम्पत्यही मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसाचं पठण करण्यावर ठाम आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीसही बजावलीय. राणा दाम्पत्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय.
याशिवाय राणा आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची होऊ नये यासाठी मलबार हिल्स येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाबाहेरही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
शिवसेना नेत्यांनी या जोडप्याला मुंबईत येऊन हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आव्हान दिलं होते. त्याला शिवसैनिकांकडून चोख प्रत्युत्तर मिळंल, असा इशारा देण्यात आला. दुसरीकडं, दाम्पत्याचा आग्रह लक्षात घेऊन खार पोलिसांनी बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावलीय.
पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतरही नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आंदोलनाला सामोरे जाण्यास तयार आहोत, मात्र निर्णय बदलणार नसल्याचं सांगितलं. शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार आहेत. त्या म्हणाल्या की, आम्हाला सुरक्षा व्यवस्था बिघडू द्यायची नाही, त्यामुळे आम्ही लोकांना तिथं येण्यास नकार दिला आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वामुळं मुख्यमंत्रीपदावर आहेत, पण आता ते त्यांची विचारधाराच विसरले आहेत, असं नवनीत म्हणाल्या. त्याचवेळी रवी राणा म्हणाले, ‘मी मुख्यमंत्र्यांना हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठणासाठी बोलावले होते, मात्र ते विदर्भात आले नाहीत.
राणा यांना जातीय तेढ पसरवायची आहे : राष्ट्रवादी
महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आमदार राणा यांच्या घोषणेबाबत निवेदन दिलं. सरकार अस्थिर करण्यासाठी आणि जातीय तेढ पसरवण्यासाठी ते हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राणा दाम्पत्य हे बंटी-बबली : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, हनुमान चालीसा पठण करणं आणि रामनवमी साजरी करणं ही श्रद्धेची बाब आहे, दिखाव्याची नाही. “राणासारखे लोक भाजपसाठी नौटंकी आणि स्टंट करणारे आहेत. लोक असे स्टंट गांभीर्याने घेत नाहीत. त्यांनी राणा दाम्पत्याला ‘बंटी और बबली’ असे संबोधले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे