नवी दिल्ली, 17 जून 2022: काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी अंमलबजावणी संचालनालयाने मान्य केलीय. आता सोमवारी ईडी राहुल गांधींची चौकशी करणार आहे. त्यासाठी नवीन समन्स बजावण्यात येणार आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी करत आहे. आतापर्यंत राहुल यांची जवळपास 30 तास चौकशी करण्यात आली आहे.
राहुल गांधी शुक्रवारी ईडीच्या चौकशीला उपस्थित राहू इच्छित नव्हते. त्यासाठी सोमवारी ही चौकशी करावी, असं आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आलं. आता ईडीने राहुलची ही मागणी मान्य केलीय. सोमवारी राहुल गांधींना चौकशीसाठी नव्याने समन्स बजावण्यात येणार आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधींची तीन दिवस चौकशी करण्यात आलीय. बुधवारीही ईडीने त्यांची 10 तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती. शुक्रवारी पुन्हा ईडीच्या कार्यालयात यावं लागेल, असे त्यांना यापूर्वी सांगण्यात आलं होतं.
तीन दिवसांच्या चौकशीबाबत बोलताना ईडीने काँग्रेस नेत्याला अनेक प्रश्न विचारले आहेत. कोलकात्याच्या त्या Dotex कंपनीबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या कंपनीबद्दल असं बोललं जात आहे की तिने 2010 मध्ये यंग इंडियाला एक कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यंग इंडियाने ते कर्ज कधीच फेडलं नाही, असा आरोप भाजप करत आहे.
पण त्या कंपनीबाबत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्पष्ट उत्तर राहुल यांच्याकडं नाही. इतर अनेक प्रश्नांना राहुल गांधी हेच उत्तर देत असल्याचीही माहिती पुढं येत आहे. त्यामुळं चौकशीची प्रक्रिया लांबत चालली आहे. यापूर्वी ही चौकशी मंगळवारपर्यंत पूर्ण व्हावी, अशी राहुल यांची इच्छा होती, परंतु ईडीकडं प्रश्नांची मोठी यादी आहे जी अद्याप संपलेली नाही.
ईडीची प्रश्नांची लांबलचक यादी
आता प्रश्नांची यादी जितकी लांबत जाईल तितके काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलनही सुरू आहे. राहुल गांधींची ईडीची चौकशी सुरू झाल्यापासून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच गोंधळ घातला. पोलिसांसोबतच्या त्यांच्या संघर्षाचे रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहेत. अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे, अनेकांना जखमाही झाल्या आहेत. मात्र राहुल गांधींना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देण्याचं सर्वजण बोलत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे