नवी दिल्ली, 24 जून 2022: चीनने आयोजित केलेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेला बुधवारपासून सुरुवात झालीय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 14 व्या ब्रिक्स परिषदेत अक्षरश: मोठं विधान केलं आहे. पुतीन म्हणाले की, रशियामध्ये भारतीय स्टोअर्स सुरू करण्यासाठी चर्चेची फेरी सुरू आहे.
ब्रिक्स परिषदेत पुतिन म्हणाले की, रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापारी समुदायांमधील संपर्क लक्षणीय वाढला आहे. रशियामध्ये भारतीय स्टोअर्स उघडण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. तथापि, रशियामध्ये भारतीय स्टोअरची कोणती साखळी सुरू होईल हे पुतीन यांनी स्पष्ट केले नाही.
यासोबतच चिनी कार, उपकरणे आणि हार्डवेअर मोठ्या प्रमाणात रशियन बाजारपेठेत आणण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. यासोबतच ब्रिक्स देशांमध्ये रशियाची उपस्थिती वाढत आहे.
रशिया, ब्रिक्स देशांचा व्यापार 38 टक्क्यांनी वाढला
ते म्हणाले की, 2022 च्या पहिल्या तीन महिन्यांत रशिया आणि ब्रिक्स देशांमधील व्यापार 38 टक्क्यांनी वाढलाय. रशियाचा ब्रिक्स देशांसोबतचा व्यापार 45 अब्ज डॉलरपर्यंत वाढला आहे.
रशियाकडून अधिक तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा अमेरिकेसह पाश्चात्य देशांशी असलेल्या संबंधांवर परिणाम झालाय. तेही जेव्हा भारताच्या एकूण तेल आयातीत रशियन तेलाचा वाटा दोन टक्क्यांपेक्षा जास्त नव्हता. भारतानेही रशियाच्या तेल खरेदीच्या निर्णयाचा बचाव केलाय. निर्बंध असूनही युरोप रशियाकडून तेल आणि वायू निर्यात करत असल्याचं भारताचे म्हणणे आहे.
रशिया ब्रिक्स देशांना मोठ्या प्रमाणात खत निर्यात करतो. पुतिन म्हणतात की रशियन आयटी कंपन्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या क्रियाकलाप वाढवत आहेत.
पुतीन म्हणाले, ब्रिक्स देशांसोबत मिळून आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यायी यंत्रणा तयार करत आहोत. आम्ही ब्रिक्स देशांच्या बँकांसोबत रशियाच्या आर्थिक संदेशवहन प्रणालीशी टाय-अप करण्याचीही तयारी करत आहोत. आम्ही ब्रिक्स देशांच्या चलनांवर आधारित आंतरराष्ट्रीय चलन तयार करण्याच्या शक्यतेचाही शोध घेत आहोत.
BRICS ही पाच देशांची संघटना आहे, ज्यामध्ये रशिया, भारत, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. चीन या वर्षी ब्रिक्स परिषदेचं आयोजन करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे