नवी दिल्ली, 27 जून 2022: महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात अंमलबजावणी संचालनालयाच्या समन्सने आणखी एक नेत्याला धक्का बसलाय. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेसपासून तृणमूलपर्यंत भाजप वर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडं संजय राऊत यांनी म्हटलंय की, त्यांचे शिरच्छेद झाले तरी ते गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाहीत.
संजय राऊत यांनीही ईडीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, मला ईडीने समन्स पाठवल्याचं समजलं आहे. महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक मोठी लढाई लढत आहोत. मला रोखण्याचं हे मोठे षडयंत्र आहे. माझं डोकं कापलं गेलं तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही.
पक्षांनी केंद्रावर हल्लाबोल केला
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं की, “ईडी विभाग भाजपच्या सर्वोच्च भक्तीचं सर्वात मोठं उदाहरण सादर करत आहे.
आपचे खासदार संजय सिंह म्हणाले, ईडीच्या कार्यालयाचं नाव बदलून भाजप कार्यालय करावं. संजय राऊत यांनी काही गुन्हा केला, मग ईडी आत्तापर्यंत का झोपली होती? आमदार अपहरण करणाऱ्या टोळीने (भाजप) ईडीला आदेश दिले आहेत का?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ईडीची कारवाई दिल्लीतून सुनियोजित आहे. पुढील रणनीतीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत आहोत.
टीएमसी पक्षाचे नेते साकेत गोखले यांनी ट्विट केलं, “अंदाजानुसार, ईडीने नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत आणि नेत्यांना समन्स बजावलं आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी त्यांचं सरकार उघडपणे एजन्सी वापरत असताना मोदी आणीबाणीबद्दल निर्लज्जपणे बोलतात हे विडंबन आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं की, “माझी आई, पत्नी आणि माझा मुलगा आणि मला तुरुंगात पाठवण्याचा कट फसला. आम्हाला धमक्या द्या, शिव्या द्या पण हिशोब द्यावा लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे