यू एस: सध्या डेमोक्रॅटिक पक्षातील उमेदवारांची यादी पाहिली तर माजी उपाध्यक्ष जो बायडेन, सिनेटर एलिझाबेथ वॉरेन आणि बर्नी सँडर्स यांची नावं आघाडीवर आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाकडून ब्लूमबर्ग यांच्यासह १७ जण अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी रिंगणात आहेत. अमेरिकेतील संपत्तीच्या असमान वाटपावरून अनेक महिने झालेल्या चर्चेनंतर ब्लूमबर्ग हेदेखील अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत सहभागी झाले.
डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ब्लूमबर्ग यांनी स्वतःच्या नावाची घोषणा केली आहे. ७७ वर्षीय ब्लूमबर्ग यांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे, की आपण ट्रंप यांचा पराभव करून अमेरिकेची पुनर्उभारणी करण्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहोत. मी त्यासाठी सगळं पणाला लावायला तयार आहे, असंही ब्लूमबर्ग यांनी लिहिलं आहे. याच महिन्यात राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी ब्लूमबर्ग यांना टोमणा मारत म्हटलं होतं, “ब्लूमबर्ग यांच्याविरोधात लढण्यापेक्षा मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीविरोधात लढणं पसंत करेन.”
या घडीला डेमोक्रॅटिक पक्षात चार महत्त्वाचे उमेदवार आहेत. त्यांची स्वतःची बलस्थान आहेत तसंच काही कमकुवत बाजूही. या उमेदवारांना सुरुवातीच्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये लढू द्यायचं आणि नंतर मार्चमध्ये डझनभर राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या वेळी आपल्याकडील साधनसंपत्तीच्या जोरावर आघाडी घ्यायची, अशी ब्लूमबर्ग यांची सध्याची व्यूहरचना दिसत आहे.