मुंबई, २३ जुलै २०२२: परदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा खरेदीकडे वळत आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात तेजी आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी केल्यामुळे शेअर बाजार चमकू लागला असून सेन्सेक्स ५६ हजारांहून अधिक अंकांवर पोहोचला आहे. २२ जुलै रोजी संपलेल्या तिमाहीत भारतीय शेअर बाजारात वाढ दिसून आली. शुक्रवारी शेअर बाजारात आयटी, फार्मा, ऊर्जा क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्र ग्रीन सिग्नल मध्ये बंद झाले.
सकारात्मक जागतिक निर्देशांक, परदेशी गुंतवणूकदारांचा दीर्घकाळानंतर झालेला परतावा, उत्कृष्ट तिमाही निकाल यामुळे बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण निश्चितच तणावात भर घालणारी आहे. या आठवड्यात भारतीय रुपयानेही प्रथमच डॉलरच्या तुलनेत ८० चा टप्पा ओलांडला आहे. मात्र, २२ जुलै रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ७९.८५ वर बंद झाला.
बाजारात तेजी
शुक्रवारी सेन्सेक्स ३९० अंकांनी वाढून ५६,०७२ अंकांवर आणि निफ्टी ११४ अंकांनी वाढून १६,७१९ अंकांवर बंद झाला. निफ्टीचे ३२ शेअर्स ग्रीन सिग्नल सह बंद झाले. त्याच वेळी १८ शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी १७ शेअर्स ग्रीन आणि १३ शेअर्स रेड सिग्नल मध्ये बंद झाले.
एका आठवड्यात इतकी तेजी
BSE सेन्सेक्स या आठवड्यात २,३११.४५ अंकांनी (४.२९ टक्के) वाढून ५६,०७२.२३ वर पोहोचला आहे. त्याच वेळी, आठवड्याच्या शेवटी, निफ्टी ६७०.३ (४.१७ टक्के) वाढून १६,७१९.५ वर बंद झाला. आतापर्यंत दोन्ही प्रमुख निर्देशांक महिन्यात सहा टक्क्यांच्या जवळ पोहोचले आहेत.
परदेशी खरेदीदारांची एन्ट्री
विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात निव्वळ खरेदीदार होते. FII ने भारतीय इक्विटी मार्केटमध्ये ४,०३७.२९ कोटी रुपयांची खरेदी केली. त्याच वेळी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ९४०.४७ कोटी रुपयांची खरेदी केली. या महिन्यात आतापर्यंत, FII ने ६,४२१.८४ कोटी रुपयांचे समभाग विकले, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ८,३०७.५१ रुपयांचे समभाग खरेदी केले.
गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्सवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस यांचा क्रमांक लागतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे