पुणे, ३० जुलै,२०२२ : महागाईची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. यातून गोर गरीब आणि मध्यमवर्गीयांना देखील महागाईने वगळले नाही. याचा फटका आता गणपती बाप्पाला बसला आहे. गणपतीच्या मूर्तींमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणपतीचे रंग, त्यांची माती सगळ्याच गोष्टी महागल्याने मूर्तीकारांनी आता मूर्तींच्या किमंतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्याचा बाप्पा यावेळी महागाईतच घरी येणार आहे. तसेच हरतालिका मूर्तीदेखील आता महाग होणार आहे. त्यातही आता पर्यावरणाचा –हास टाळण्याच्या उद्देशाने शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्रथम प्राधान्य दिले गेले आहे. शाडूची मातीच महागल्याने मूर्तींची किंमत वाढली असल्याचं मूर्तीकारांचे म्हणणे आहे.
आता नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. त्यामुळे फुलांची आवक पहाता आणि ओला दुष्काळ पाहता बाजारात फुलं कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे फुलांचे दर वाढले आहेत. त्यातही निशीगंध, मोगरा आणि झेंडू या फुलांच्या किंमती वाढल्या आहेत.
श्रावण आला की सणवार आलेच. नवीन कपडे, दागिने याची रेलचेल पहायला मिळते. पण आता कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदाच एवढा मोठ्या प्रमाणावर उत्सव सुरु होत आहे. पण याचा उलट परिणाम बाजारात पहायला मिळत आहे. कपडे, दागिने यासर्वांच्या किंमती बाजारात वाढलेल्या दिसत आहेत. त्यामुळे या वेळी हौसेला-मौजेला लगाम घालावा लागणार आहे.
आंतराराष्ट्रीय बाजारात रुपया घसरला असल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर दिसत आहे. त्याचेच हे उलट परिणाम आहेत. त्यामुळे खिशाला टाच देत यंदा सगळे सण वार साजरे करावे लागणार आहेत, हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस