नवी दिल्ली, ४ ऑगस्ट २०२२: भारताचे सरन्यायाधीश (CJI) एन व्ही रमणा यांनी पुढील CJI साठी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केलीय. CJI रमणा यांनी हे शिफारस पत्र कायदा आणि न्यायमंत्र्यांना सादर केलंय.
न्यायमूर्ती यू यू लळीत यांच्या नावाची शिफारस मान्य झाल्यास ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश बनतील. न्यायमूर्ती एनव्ही रमण हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी CJI एनव्ही रमणा यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकार्यांच्या नावाची शिफारस करण्याची विनंती केली होती. रिजिजू यांचं ३ ऑगस्ट रोजी लिहिलेले पत्र सायंकाळी उशिरा सरन्यायाधीशांच्या कार्यालयाला प्राप्त झालं.
परंपरेनुसार, त्यांच्या निवृत्तीच्या सुमारे एक महिना आधी, सरन्यायाधीश त्यांच्या उत्तराधिकारीची शिफारस सीलबंद कव्हरमध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवतात. सहसा, सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाचे नाव म्हणजे ज्येष्ठतेच्या क्रमाने क्रमांक दोनचे नाव लिफाफ्यात असते.
पारंपारिकपणे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या ज्येष्ठतेच्या आधारावर CJI म्हणून पदभार स्वीकारतात. सरन्यायाधीश म्हणून कोणताही निश्चित कार्यकाळ नाही. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय संविधानानुसार ६५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
४ महिन्यांत देशाला ३ CJI दिसणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात अनेक दशकांनंतर अशी संधी येणार आहे, जेव्हा चार महिन्यांत देशाला तीन सरन्यायाधीश दिसणार आहेत. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या व्यतिरिक्त, न्यायमूर्ती उदय उमेश लळीत आणि न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे देखील या वर्षी जुलैपासून येत्या नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश बनतील. या रंजक योगायोगानंतर पाच वर्षांनंतर २०२७ मध्ये देशात असाच योगायोग पाहायला मिळणार आहे. २०२७ मध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत तीन सरन्यायाधीश येतील आणि जातील.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे