पिंपरी चिंचवड, १० ऑगस्ट २०२२; पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील पाळीव प्राणी सांभाळणाऱ्या नागरिकांना आता घरबसल्या ऑनलाईन श्वान पाळण्याचा परवाना काढता येईल. मी.न.पा.आयुक्त पाटील यांनी हि माहिती दिली.परवाना काढल्यानंतर तो श्वान फिरवताना नेहमी जवळ बाळगावा. श्वानाचे रेबीज लसीकरण वेळच्या वेळी होणे बंधनकारक आहे.
शहरात पाळीव श्वानांची संख्या जास्त आहे,परंतु त्यांचा रीतसर परवाना काढायची बऱ्याच श्वान प्रेमींमध्ये इच्छा दिसत नाही. परंतु आता ऑनलाईन परवाना मिळत असल्या कारणाने श्वानप्रेमींनी तो काढावा अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. यापुढे बिगर परवाना श्वान पाळणे बेकायदेशीर ठरेल आणि त्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असे हि ते म्हणाले.
आजूबाजूचा परिसर घाण होईल तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही नुकसान पाळीव श्वानांमार्फत होऊ न देण्याची जबाबदारी परवाना धारक कुत्र्यांच्या मालकाची असेल आणि तसे घडल्यास त्याच्यावर दण्डात्मक कारवाई होणार असेही महानगर पालिके कडून सांगण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यास साखळी किंवा पट्टा बांधणे अनिवार्य असेल जेणेकरून तो मोकळा राहणार नाही तसेच चावा घेणार नाही याची खबरदारी घ्यावी.
महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन श्वान परवाना येथे नोंदणी केल्यांनतर ती माहिती पशुवैद्यकीय विभागाला जाईल. त्यानंतर शहानिशा होऊन आपल्याला परवाना मंजुरी मिळेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे