पुणे, १२ ऑगस्ट २०२२: धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळं मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलाय.
अचानक वाढलेल्या पाण्यामुळं नदीकाठच्या रस्त्यावर उभी असलेली वाहनं पाण्याखाली गेली. पाण्यातील वाहने बाहेर काढण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अचानक आलेल्या पाण्यामुळे नागरिकही अडकून पडले होते. त्यांना पुणेमहानगर पालिकेच्या बचाव पथकाकडून बाहेर काढण्यात आलं.
आता मात्र पावसाचा जोर ओसरला असून धरणातून पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आलाय. त्यामुळं कालच्या तुलनेत रस्त्यावरील पाणीही कमी झालंय. परंतु आज पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रामध्ये अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर