औरंगाबाद, १७ ऑगस्ट २०२२ : केंद्र सरकारने सुरू केलेली अग्निवीर भरती प्रकिया शनिवारपासून औरंगाबाद येथून सुरु करण्यात आली आहे. सात जिल्ह्यातील तरुणांसाठी औरंगाबादमध्ये रिक्रूटमेंट विभागाअंतर्गत ही भरती प्रकिया होत आहे. मात्र या भरतीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून औरंगाबाद येथे आलेल्या तरुणांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. राहण्याची सोय नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे झोपून रात्र काढावी लागत असून, पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
महाराष्ट्रात औरंगाबाद येथून या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. मराठवाड्यातील एकूण सात जिल्ह्यातून हजारो तरुण औरंगाबाद मध्ये दाखल झालेले आहेत. मराठवाड्यातील तब्बल ७६ हजार तरुणांनी ऑनलाइन अर्ज दाखल करून भरतीमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र भरतीसाठी आलेल्या तरुणाची राहण्यासाठी काहीही सोय नसल्यामुळे त्यांना रस्त्यावर, मंदिरा समोर जिथे आसरा मिळेल तिथे झोपण्याची वेळ आली आहे.पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही. अग्निवीर होऊन देशाची सेवा बजावण्याचे स्वप्न उरी बाळगलेल्या तरुणांना वास्तव विदारक गोष्टींचा सामना सहन करावा लागत आहे.
औरंगाबाद येथे होत असलेल्या अग्नीवीर भरतीसाठी आलेली बहुतांश मुले बाहेर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांना येथील रस्ते व इतर बाबींची माहिती नाही. येथे रिक्षाचालकापासून हॉटेल मालकापर्यंत त्यांची लूट केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल आणि अग्निवीर ट्रेड्समन या पदांसाठी पुढील चार महिन्यांत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दादरा, दमण, दीव आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांमध्ये अग्निवीर महिला मिलिटरी पोलिसांच्या टप्या-टप्याने एकूण आठ टप्प्यात भरती आयोजित केल्या जाणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबादपासून याची सुरवात झाली आहे. शनिवारपासून औरंगाबादमध्ये भरती प्रक्रिया सुरु आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर