नवी दिल्ली : कुत्र्याच्या चाटण्यामुळे एका माणसाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यूरोपियन जर्नल ऑफ केस रिपोर्ट्स इन इन्टर्नल मेडिसीन नामक प्रसिद्ध झालेल्या अहवालात हे प्रकरण नमूद करण्यात आहे.
हा माणूस शारीरिकरित्या तंदुरुस्त होता. त्याच्या घरच्या कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याला चाटले होते. कुत्र्याने चाटल्यानंतर काही वेळाने त्या माणसाला श्वसनाला त्रास होऊ लागला. म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याच्या चेहऱ्यावर पुरळ उठलं होतं, त्याला १०६ तापही येत होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला न्यूमोनिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमांमध्ये पू होऊन गँगरीनही झाले होते. तापही उतरत नव्हता. त्याचा एक एक अवयव हळूहळू निकामी होऊ लागला आणि दोन आठवड्यातंच त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर निष्कर्ष काढला. Capnocytophaga canimorsus नावाच्या एका विषाणूमुळे या माणसाला हा त्रास झाला होता. प्राण्यांच्या चावण्यामुळे या विषाणूंचं संक्रमण होते. मात्र, १५ लाख लोकांमध्ये फक्त एकालाच अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ज्यांनी घरात कुत्रे पाळले आहेत. त्यांनी ताप आल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.