चंद्रपूर, २७ ऑगस्ट २०२२: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस गावामध्ये अचानक, एक निवासी घर जमिनीमध्ये गाडले गेले आहे. थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेमुळे नागरिकांच्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संपूर्ण घरच सुमारे सत्तर फूट खोल जमिनीमध्ये कायप झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटने नंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आणि जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घुग्गुस गावातल्या आमराई परिसरात आजूबाजूला कोळसा खाणी आहेत. त्याचबरोबर वर्धा नदीचे पात्र आहे. याच भौगोलिक परिस्थितीमुळे भूमिगत कोळसा खाणीत तयार झालेली पोकळी आणि पुराचे पाणी झिरपल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत आहे. घटनेनंतर सध्या या ठिकाणच्या ५० हून अधिक घरातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. येथील वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेड, प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणा वेगाने कामाला लागले आहेत. घटनेनंतर घटनास्थळी जाऊन भूगर्भ अभ्यासक आणि कोळसा खाणीचे अधिकारी प्रत्यक्ष स्थितीचा अभ्यास करणार आहेत.
घटना घडली तेव्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांपैकी कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. घुग्गुस येथिल गजानन मडावी यांचं हे घर आहे. घराला अचानक हादरे बसू लागल्याने, भीतीने घरातील लोक बाहेर आले. यानंतर काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले संपूर्ण घर सत्तर फूट जमिनीत गायप झाले. या घटनेनंतर लोकांच्यात एकच खळबळ उडाली. सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फील्ड्स लिमिटेडच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अशाप्रकारे घर जमिनीत गायप होण्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर