मुंबई, ३१ ऑगस्ट २०२२: कोरोना कालखंडाच्या मोठ्या विश्रांतीनंतर, वर्षभर भाविकांनी आतुरतेने वाट पाहिलेल्या गणेशोत्सवाला आज सुरुवात झाली. मुंबईमध्ये प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दरबारात मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महिला भाविकांना सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे.
मागील दोन वर्ष कोविडचे असलेले निर्बंध आणि मर्यादा यामुळे गणेशोत्सव सध्या स्वरूपात होत होता. परंतु यावर्षी सर्व निर्बंध हटवल्यामुळे सर्वत्र परत नागरिक मोठ्या जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पांचा मोठया उत्साहात वाजत गाजत गणेशोत्सव साजरा करत आहेत. मुंबईत तर या उत्सवात वेगळाच जल्लोष असतो.
मुंबईतील गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झालेली पहावयास मिळत आहे. आज पहाटेपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी एक महिला भाविक आणि येथील सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
आज सकाळी पहाटे पाच वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आली आणि त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली होती. अशातच लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी जास्त वेळ रांगेत थांबण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एका भाविक महिलेनं केली.
परंतु गर्दी जास्त असल्यामुळे महिला भाविक आणि सुरक्षारक्षकामध्ये शाब्दिक बाचाबाची घडली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी महिला भाविक आणि सुरक्षारक्षांना बाजूला केले. या घटनेमुळे याठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर