राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या! शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा धक्का

9

मुंबई, ३ सप्टेंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिवसेनेला मोठा धक्काही बसला आहे. कारण शिवसेनेच्या अनेक आमदारांनी भाजपसोबत जाऊन नवीन सत्ता स्थापन केली. यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालूच आहे. आणि या दरम्यान आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्काच दिला आहे. आता ठाकरे सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी मागे घ्या अशी मागणी मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण ही यादी रद्द करा अशी मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे. राज्यात आता सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपालांना नियुक्त जागांवर आता नवीन नाव देणार असल्याचे ही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावं सुचवणार असल्याने आत्ता हा महाविकास आघाडीतील पक्षांसाठी धक्का मानला जात आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदार कोण असणार हे आता शिंदे गट आणि भाजपाचं सरकार ठरवणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे