मुंबई, ३ सप्टेंबर, २०२२ : शिवसेनेची आन-बान-शान म्हणजे दसरा मेळावा. पण हाच दसरा मेळावा आता वादाचे कारण ठरला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा हे शिवसेनेचे अभिमानाचे प्रतीक मानलं जात होतं. पण राजकारणाची गणित वेगळी असतात, हेच खरं.
मागच्या वर्षापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा झाला. त्यानंतर या वर्षी या शिवसेनेला नजर लागली. शिवसेना फुटून त्यापासून शिंदे गट वेगळा झाला. पुढे शिंदे गटाचे आमदार वाढले आणि शिंदे गटाने स्वत:चे सरकार स्थापन केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि सगळी गणित बदलली.
आता दसरा जवळ आला आणि या मेळाव्यावरुन राजकारण रंगलं. शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार, यावरुन वाद सुरु आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी परवानगी मागितली. तर त्याच जागेसाठी आता शिंदे गटानेही बाह्या सरसावल्या आहेत. आमची शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा उद्धव ठाकरे आणि शिंदे गट करत आहे. आता कोणाला परवानगी मिळते, हे तर पहावं लागेल. जर उद्धव ठाकरे यांना परवानगी मिळाली तर पारंपरिक मेळावा म्हणावा लागेल. जर शिंदे गटाला परवानगी मिळाली तर नवा गडी नवा राज्य म्हणावं लागेल.
हे सर्व होत असताना आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आगीत तेल ओतले आहे. बाळासाहेबांचे विचार जर जनतेपर्यंत पोहोचवायचे असतील तर राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घेतला पाहिजे, असं वक्तव्य केले. त्यामुळे या वादात आता मनसेची भर पडली आहे.
पण आता ही परवानगी कोणाला मिळणार, कोण मेळावा घेणार आणि खरी शिवसेना कोण, कोण जिंकणार कोण हरणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी दस-याची वाट पहावी लागणार हे खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस