पुणे,६ सप्टेंबर २०२२ : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीच्या या निर्णयनंतर काही मिनिटातच रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. आता सुरेश रैनानं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे.
सुरेश रैनानं आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्यानं याबाबत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कळवलं असल्याची माहिती समोर येत आहे. तो आता ख्रिस गेल, कायरन पोलार्ड इत्यादींप्रमाणे देश-विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानं १५ ऑगस्ट२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलच्या २०५ सामन्यांमध्ये ५ हजार ५२८ धावा करणाऱ्या रैनाला गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जनं संघात कायम ठेवले नाही आणि मेगा ऑक्शनमध्येही तो अनसोल्ड ठरला.
सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सुरेश रैनानं २२६ एकदिवसीय, १८ कसोटी आणि ७८ टी-२० सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं पाच शतक आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीनं ५ हजार ६१५धावा केल्या आहेत. तर, कसोटीत त्याच्या नावावर ७६८ धावांची नोंद आहे. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये त्यानं १हजार ६०५ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
३५ वर्षीय रैनाने आयपीएलला रामराम ठोकत फक्त देश-परदेशातील टी २० लीग खेळण्याचे मन बनवले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना स्वत: रैनाने याबद्दल माहिती दिली आहे. तो १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. जर तो रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झाला तर इंडिया लिजेंड्सकडून या स्पर्धेत पदार्पण करेल. ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडूलकर या संघाचा कर्णधार असू शकतो. याच पार्श्वभूमीवर तो सध्या गाझियाबादमध्ये कसून सरावही करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव