नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२२: बायडेन प्रशासनाने पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी ४५ करोड डॉलर्सची मदत मंजूर केली आहे. या आर्थिक मदतीमुळे पाकिस्तान संरक्षण क्षेत्रातील सध्याच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता राखेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी कॉर्पोरेशन एजन्सीने बुधवारी याबाबत माहिती दिली.
पाकिस्तानला अमेरिकेकडून F-16 या लढाऊ विमानाची उपकरणे आणि देखभालीसाठी एवढी मोठी मदत देणे भारतासाठी मोठा धक्का आहे हे उघड आहे. मात्र, यामुळे या भागातील लष्करी संतुलनावर परिणाम होणार नाही, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
२०१८ नंतर अमेरिकेकडून पाकिस्तानला दिलेली ही पहिली मोठी सुरक्षा मदत आहे. २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला सुरक्षा मदत बंद केली होती. अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तान कोणतेही सहकार्य करत नसल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
काँग्रेसने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पाकिस्तानला देण्यात आलेल्या या सुरक्षा मदतीत कोणतीही नवीन शस्त्रे आणि युद्धसामग्रीचा समावेश करण्यात आलेला नाही. पेंटागॉनने सांगितले की, या सुरक्षा मदतीद्वारे पाकिस्तान दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिकेला पाठिंबा देईल, ज्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल.
पाकिस्तान दहशतवाद विरोधी भागीदार
युनायटेड स्टेट्स सरकारने ४५० दशलक्ष डॉलर्सच्या F-16 जेट देखभाल कार्यक्रमाला पाकिस्तानने मंजूरी दिल्याबद्दल काँग्रेसला कळवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तान हा अमेरिकेच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक महत्त्वाचा सहयोगी आहे आणि त्याच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून, “अमेरिकन वंशाच्या उपकरणांच्या देखभालीसाठी” पॅकेज पुरवत आहे.
परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते पुढे म्हणाले, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांसाठी पाकिस्तानचा एफ-16 कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. अमेरिकेच्या या मदतीमुळे सध्याच्या आणि भविष्यातील दहशतवादविरोधी धोक्यांना तोंड देण्याची पाकिस्तानची क्षमता कायम राहील. ते म्हणाले, “आम्हाला आशा आहे की पाकिस्तान सर्व दहशतवादी गटांवर सातत्याने कारवाई करेल.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे