बॉयकॉटच्या सावटानंतरही रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मास्त्रची १०० कोटींची कमाई

15

मुंबई ,१२, सप्टेंबर २०२२ : बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या’ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या रिलीजला दोन दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाला सुरुवातीला बायकॉट ट्रेंडला सामोरे जावे लागले. पण हा चित्रपट त्याच्या शीर्षकाप्रमाणेच बॉलिवूडचा ब्रह्मास्त्र म्हणून उदयास आला. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात चांगलीच कमाई केली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची जादू जगभरात पसरली आहे. शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई केली होती. ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले होते. कोरोनानंतर ओपनिंग डे ला हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या दिवशीही ब्रह्मास्त्राचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे. या चित्रपटाचे दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.हे पाहिल्यानंतर हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्यास जास्त वेळ लागणार नाही असे म्हणता येईल.

ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा जगभरात ८९१३ स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने जगभरात ७५ कोटी तर दुसऱ्या दिवशी ८५ कोटींची कमाई केली. तसेच अनेक भाषांपैकी हिंदी भाषिक चित्रपटाने पहिल्या दिवशी ३२ कोटी तर दुसऱ्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे दोन दिवसांत या सिनेमाने १६० कोटींचा गल्ला जमवला आहे.

हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेच डब केला गेला. या चारही भाषांमधील चित्रपटांची कमाई समाधनकारक आहे. चित्रपटातील नागार्जुनची भूमिका आणि बाहुबली फेम एस. एस. राजामौली यांनी प्रमोशन केल्याने तेलुगू भाषेच्या चित्रपटाची कमाई चांगली होण्याची अपेक्षा होतीच. मात्र तामिळ भाषिक कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ब्रह्मास्त्रने शनिवारी तामिळनाडूमध्ये १.९ कोटी रुपयांची कमाई केली. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाने एका दिवसात एवढी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

३५० कोटींच्या बजेटमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमावर या सिनेमाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी गेली ८ वर्ष मेहनत घेत होते. आता ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई पाहता अयान मुखर्जींच्या मेहनतीचं चीज झाल्याचं दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.

विशेष म्हणजे, ब्रह्मास्त्र हा २०२२ चाच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीचाही बहुप्रतिक्षित चित्रपट होता. २०२२ हे वर्ष बॉलीवूडसाठी वाईट ठरले आहे आणि अनेक मोठे चित्रपट आपटले आहेत. त्यामुळे व्यापार विश्लेषकांना ब्रह्मास्त्रकडून खूप आशा आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव