मुंबई, १४ सप्टेंबर २०२२ : काही दिवसापासून मनसे अध्यक्ष आणि शिंदे गटातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने तसेच गणपती दर्शनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोनदा एकमेकांना भेटल्या मुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. पण, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मनसेनी एकला चलो रे चा नारा दिला असल्याची माहिती दिली आहे.
संदीप देशपांडे यांनी वृत्तवाहिनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पालिका निवडणुकीत सर्व जागेवर मनसेचे उमेदवार उभे करण्यात येतील. तसेच मुंबईत २२७ जागावर आम्ही स्वबळावर लढणार आणि मग मुंबई असो नवी मुंबई संभाजीनगर येथेही आमचे सर्व पदाधिकारी सर्व हिमतीने स्वबळावर पालिका निवडणुका लढवणार आहेत. तसेच देशपांडे पुढे बोलतात की, युती हा जर तर चा विषय आहे. तसं तर कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य कायम ठेवण्यासाठी आम्ही स्वबळावर लढणार आहोत.
यासोबतच संदीप देशपांडे यांनी दसरा मेळाव्यावरूनही भाष्य केले आहे. सन्माननीय राजसाहेब हे बाळासाहेबांच्या जशाप्रकारे विचारांचा वारसा पुढे घेऊन जातात तो महत्वाचा आहे, दसरा मेळावा म्हणजे हा बाळासाहेबांचा विचारांचा मेळावा आहे. दसरा मेळावा हा कोणी कुठे पण घेऊद्या, हा महत्त्वाचा नसून बाळासाहेबांच्या विचारांचा मेळावा घेणे हा महत्त्वाचा आहे आणि ती गोष्ट फक्त राज साहेब ठाकरें मध्येच आहे.
मनसेच्या इंजिनला दोन नवीन डबे मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता मनसेनं स्वबळाचा नारा देत भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे