लालबागच्या राजाच्या वस्तूंचा लिलाव, लिलावामध्ये लागली लाखो रुपयांची बोली

मुंबई, दिनांक १६ सप्टेंबर २०२२ : कोरोना कालखंडानंतर यावर्षी गणरायाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वर्षी प्रथमच खुल्या वातावरणामध्ये गणेशोत्सवात भाविक भक्तांना सोहळ्याचा आनंद घेता आला. या कालावधीमध्ये लाखो भक्तांनी श्री गणेशाच्या दर्शनासाठी झुंबड उडवल्याचे चित्रही आपण पाहिले. यामध्ये अनेक भाविकांनी मनोभावे आपल्या बाप्पाला अनेक वस्तू दान स्वरूपात अर्पण केल्या. लालबागच्या राजाला अशाच भाविकांनी अर्पण केलेल्या वस्तूंचा लिलाव झाला. या लिलावामध्ये लालबागच्या राजाच्या वस्तूंना कोट्यावधी रुपयांची बोली लावण्यात आली.

यावर्षीच्या गणेशोत्सव कालावधीमध्ये लालबागच्या चरणी भाविकांनी, मनोभावे अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव काल गुरुवारी करण्यात आला. यावेळी जमा झालेल्या एकत्रित वस्तूंचा एक कोटी तीस लाख रुपयांचा लिलाव झाला आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दानपेटीत पाच कोटींचे दान जमा झाले होते. त्यात मौल्यवान वस्तूंसह एका दुचाकीचा ही समावेश होता. या सर्व वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

सायंकाळी सुरू झालेला हा लिलाव रात्री दहापर्यंत चालू होता. आपल्या बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तू आपल्याला मिळाव्यात या मनोभावे अंतकरणांनी सुमारे दोनशे भक्तजनांनी लिलावाला हजेरी लावली होती. यावेळी या भक्तांनी यातील वस्तूही विकत घेतल्या.

या लिलावा मध्ये सोन्याचा मोदक सव्वा किलोचा होता. त्यासाठी एका महिला भाविकेनी साठलाख तीनहजार रुपयांची बोली लावत तो विकत घेतला. साडे सतरा तोळ्याचा हार एका भक्ताने साडे आठ लाख रुपये किमतीमध्ये विकत घेतला. तसेच एक दुचाकीला सहासष्ट हजाराची बोली लावून एका भक्ताने विकत घेतली.

यावर्षी १४ किलो ४३३ ग्रॅम चांदी आणि ३ किलो ६७३ ग्रॅम सोन्याच्या वस्तू लिलावात ठेवल्या होत्या. यामध्ये मोदक, हार, फूल, मूर्ती, गदा, चैन अशा सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंचाही समावेश होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा