नाशिक, १७ सप्टेंबर २०२२ : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक दुःखद घटना घडली आहे. महाराष्ट्रातून तब्बल आठ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून आलेले लोकप्रिय नेते आणि देशाचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर अनेक राजकीय नेत्यांनी ट्वीटर वरून श्रद्धांजली अर्पण केली आहे.उद्या नवापूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
माणिकराव गावित यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णाल्यात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
माणिकराव गावित यांनी देशाचे माजी गृहराज्य मंत्रिपद भूषवले होते. त्याचबरोबर लोकसभेचे हंगामी अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले होते. तब्बल ८ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातुन ते काँग्रेसचे खासदार होते. दोन वेळा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री पद त्यांनी सांभाळले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर