पार्किंगमधील कारमधून दोन लाखांची रोकड लंपास, पुण्यातील गहुंजे परिसरातील घटना

पुणे, १९ सप्टेंबर २०२२ : पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना काळात घरांची रेकी करून अनेक ठिकाणी घरपोडी झाल्याच्या घटना घडल्या. समाजात कुठे घरफोडी करून तर कधी गर्दीच्या ठिकाणी हातो हात चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातून चोरट्यांनी अनेक उच्चभ्रू लोकांना लाखोंचा गंडा घातल्याचेही समोर आले आहे. अशीच एक चोरीची घटना मावळमध्ये घडली आहे. गहुंजे परिसरातील सोसायटीच्या पार्किंगमधील कारमधून दोन लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.

सदर घटनेमध्ये मावळ तालुक्यातील गहुंजे येथे एका सोसायटीच्या पार्किंगमधील कारमधून दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. प्रविणकुमार सिंह यांनी लोढा सोसायटीच्या पार्किंग मध्ये आपली कार पार्क केली होती. यानंतर अज्ञात चोरटा कारमधील दोन लाख रुपये चोरून पसार झाला आहे. प्रविणकुमार यांनी याबाबतची तक्रार शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, तक्रारदार यांनी त्यांची मर्सिडीज कार लोढा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. गाडी पार्क करताना त्यांनी कारमध्ये दोन लाख दहा हजार रोख रक्कम ठेवली होती. शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून रोख रक्कम चोरून नेली. सध्या या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा