मुंबई, २० सप्टेंबर २०२२ : नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. त्यांच्या ‘अधिश’ या बंगल्यासंदर्भातील याचिकेवर न्यायालयाने आज निकाल सुनावला आहे. दोन आठवड्यात बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जुहूमधील ‘अधिश’ या ७ मजली बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही, असं म्हणत हायकोर्टाने राणे यांची याचिका फेटाळली आहे. या व्यतिरिक्त कोर्टाने नारायण राणे यांना १० लाखांचा दंडही ठोठावला आहे.
दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अवैध बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई महानगरपालिकेला दिली होती. पण आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई मुंबई महानगरपालिकेने केली नसल्याचा आरोपही दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर महापालिकेने ही तक्रार गांभीर्याने घेत चौकशी केली. यावेळी प्राथमिक चौकशी आणि तपासणी मध्ये तथ्य आढळून आले. यानंतर पालिकेने मुंबई महानगरपालिका कायदा १८८८, कलम ४८८ नुसार नारायण राणे यांना बेकायदेशीर बांधकामा संदर्भात नोटीस पाठवली. यावरून नारायण राणे यांनी कोर्टात दाद मागितली.
दरम्यान याचिका फेटाळल्यानंतर, नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई ही सुडाने केली जात असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि नारायण राणे यांच्या दोन्ही पुत्रांनी केला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव