सातारा, २० सप्टेंबर २०२२ : आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेड ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पॅनल विजयी झाला. त्यानंतर वृत्तवाहिनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलतात की खेड ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या विरोधात तीन आमदार, दोन खासदार यांची ताकद होती. पण माझ्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांची ताकद होती. त्यामुळे मी कोणालाही घाबरत नाही असे विधान करत विरोधकांना आमदार शिंदेंनी इशारा दिला आहे.
तसेच या वेळी आमदार शिंदे पुढे बोलतात की, माझ्या मतदारसंघातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या, यापूर्वी त्या संपूर्ण ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होत्या. त्यातील खेड ग्रामपंचायत मध्ये जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे. माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा पूर्ण विश्वास दिसत आहे. त्यामुळे आम्हाला या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये यश मिळालं आहे.
चुकीच्या शक्तीचा पराभव हा नेहमी होत असतो, पाहिलं तर खेड ग्रामपंचायतीत विरोधकांकडे तीन आमदार दोन खासदारांची ताकद होती. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची ताकद माझ्यासोबत असल्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. राज्यातील प्रत्येक सामान्य नागरिक शिंदे गट शिवसेनेला आणि भाजप सरकारच्या विकास कामांसाठी नेहमी उभा आहे. असे विधान करत आमदार महेश शिंदे यांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे