मुंबई २४ सप्टेंबर २०२२: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाल्यानंतर या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळल्यानंतर, शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी चार ओळीत ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सत्यमेव जयते, आपला दसरा हा शिवतीर्थावरच, विजयादशमी म्हणजे सत्याचा विजय, सन्माननीय उच्च न्यायालयाचे आभार,” अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटांच्या याचिके विरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने सरवणकरांची याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला. पालिकेचे निर्णय नाकारण्याचे निर्णय वास्तविकतेला धरून नाही, असं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. दादर पोलिसांचं संख्याबळ पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचंही न्यायालयाने नमूद केले.
“न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याची परवानगी राज्य सरकारची आहे. ही जबाबदारी ते पाडतील, असं मला विश्वास आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो सार्थक ठरला आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, दसरा मेळाव्याला उत्साहात, शिस्तीने या, आनंदाला गालबोट लागले, अस कोणतेही कृत्य होऊ देऊ नका. इतर काय करतील माहित नाही. कारण हा निकालही देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणार निकाल असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड