वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून चार मुले अचानक बेपत्ता, जिल्ह्यात उडाली सर्वत्र खळबळ

वर्धा, २५ सप्टेंबर २०२२: राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सोशल मीडियावर सध्या मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयाने निष्पाप नागरिकांवर हल्ला झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशातच आता वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामध्ये चार अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मसाळा या ठिकाणी ही घटना घडली आहे. येथील पप्पू देवढे १३ वर्षे, राज येदानी वय १३, राजेंद्र येदानी वय १२ आणि संदीप भुरानी वय ८ वर्षे अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. पप्पू देवढे याला शनिवारी शाळेतून सकाळी त्याच्या वडिलांनी घरी आणले होते. त्यानंतर पप्पू देवढेचे वडील आपल्या कामासाठी गेले.

त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याचे वडील कामावरून घरी आले. तेव्हा आपला मुलगा घरी दिसला नाही. त्यांनी गावात आणि नातेवाईकांकडे सर्वत्र त्याचा शोध घेतला. त्याचा शोध घेत असताना गावातील त्याचे आणखी तीन मित्र बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पालक वर्गामध्ये एकच भीतीचे वातावरण तयार झाले. गावामध्ये सगळीकडे शोध घेऊन मुलांचा शोध लागला नाही. त्यानंतर पालकांनी सेलू पोलीस ठाणे गाठले. पप्पू देवढे याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सेलू पोलिसांकडून केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा