दिल्ली, २७ सप्टेंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरुद्ध पुकारलेल्या ऐतिहासिक बंडानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकीय सत्ता संघर्षाचा निर्णय येऊन ठेपला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात उद्भवलेल्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या आधी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने शिवसेनेतील फूट निवडणूक आयोगातील प्रकरण, विधानसभा उपाध्यक्ष, शपथविधी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांचं प्रकरण पाच सदस्य घटनापिठाकडे वर्ग करण्यात आला आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटनापिठापुढे आज सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठासमोर सुनावणी पार पडणार आहे. यात चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती एम आर शहा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली, आणि न्यायमूर्ती पी नरसिंह यांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे आजची सुनावणी ही महाराष्ट्रातील जनतेला लाईव्ह स्ट्रीमिंग द्वारे बघायला मिळणार आहे. घटना पिठाच्या सुनावण्याच लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचा निर्णय न्यायालयाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
आजच्या या सुनावणी कडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव