मुंबई, २८ सप्टेंबर २०२२ : भाजपच्या महिला नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानावरून चांगलेच वातावरण तापलेले असताना, भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण झाले आहे. त्यात आता मुंनगंटीवारांनी प्रतिक्रिया देत पंकजा मुंडेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे हा वाद लवकरच शांत होईल असे चित्र दिसू लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
यादरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या विधानावर भाष्य केलं आहे. मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे, असं सांगत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची पाठराखण केली. तसेच पुढे बोलतात की अनेकदा असं होतं की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव असावा असं मला वाटतं. यासंबंधीच अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतलं पाहिजे असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनीदेखील पंकजा मुंडेंची बाजू घेत प्रतिक्रिया दिली आहे. ‘अनेक वर्ष मी प्रामाणिकपणे काम केलं असेल तर मला कुणीही पराभूत करू शकणार नाही, अशी त्यांची भावना असेल. कदाचित मोदींचं नाव त्यांनी कोणत्या अर्थाने घेतलं, हे मला सांगता येणार नाही. पण, मोदींना आव्हान दिलं असेल तर ते दुर्दैवी आहे. मोदींना आव्हान दिलं नसेल. त्याचा अर्थ तसा घेतलाही जाऊ नये, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे