काबूल मध्ये गृहमंत्रालयातील मशिदीत नमाज पठणादरम्यान भीषण स्फोट, ३ ठार, २५ जखमी

काबूल, ६ ऑक्टोंबर २०२२: अफगाणिस्तानात अलीकडच्या काळात सातत्याने बॉम्बस्फोट होण्याचं सत्र सुरू आहे. खास करून अफगाणिस्तानची राजधानी काबुलला सातत्यानं लक्ष केलं जातंय. नुकत्याच शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्यानंतर बुधवारी गृह मंत्रालयाच्या आवारात बांधलेल्या मशिदीत भीषण स्फोट झाला. स्थानिक मीडियानुसार, अफगाण मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल नफी तकोर यांनी स्फोटाबाबत माहिती देताना सांगितलं की, तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले.

तालिबानने सांगितलं की, काबुलमधील सरकारी मंत्रालयाच्या मशिदीत अधिकारी आणि पाहुणे नमाज पढत असताना स्फोट झाला. अब्दुल नफी ताकोर म्हणाले, “मशिदीचा वापर अभ्यागतांकडून केला जातो आणि काहीवेळा अंतर्गत मंत्रालयाचे कर्मचारी करतात.” मंत्रालय संकुल काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आहे, जे अतिशय सुरक्षित क्षेत्र आहे.

शाळेत स्फोट, ४६ मुलींसह ५३ ठार

अलीकडेच पश्चिम काबूलमधील शाहिद माजरी रोडवरील एका शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ४६ मुली आणि महिलांचाही समावेश होता. यामध्ये सुमारे ११० जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्था एएफपीने संयुक्त राष्ट्राच्या हवाल्याने म्हटलंय की, हा स्फोट ३० सप्टेंबर रोजी झाला होता. हल्ला झाला तेव्हा वर्ग खचाखच भरला होता. स्फोटानंतर मृतदेहांचे चिथडे उडले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतरचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये रक्ताने माखलेल्या पीडितांना हॉस्पिटलमध्ये नेताना दिसत आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितलं की, या कोचिंग सेंटरमध्ये विद्यार्थी आणि मुली हायस्कूलच्या पदवीची तयारी करत होते. हा स्फोट झाला तेव्हा विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेचा सराव करत होते.

रशियन दूतावासाच्या गेटवर स्फोट, १० ठार

५ सप्टेंबर रोजी काबूलमधील रशियन दूतावासाच्या गेटवर मोठा हल्ला झाला होता. या अपघातात २ रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांसह १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा