उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फुसका बार- राणा दाम्पत्य

अमरावती, ६ ऑक्टोंबर २०२२ : काल, ५ ऑक्टोबरला शिवसेनेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदात दोन दसरा मेळावे झाले. एक म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. मुंबईत झालेल्या या दोन्ही मेळाव्यांमधून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. या पार्श्वभूमीवर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्कवरील सभा म्हणजे फुसका बार आहे, अशा शब्दांत रवी राणा यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा आपल्यामध्ये आणली असल्यामुळं त्यांना हा देखावा करावा लागतोय, असं देखील रवी राणांनी म्हटले आहे. रवी राणा हे अमरावतीत माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. तसेच हिंदुत्वाचा देखावा करण्याची उद्धव ठाकरेंना गरज का पडतेय? बाळासाहेबांच्या विचारधारेचा विसर पडल्यामुळं शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिला. हिंदुत्त्वाचं नाव घेऊन, हिंदू विचारांची दिशाभूल ठाकरे करत असल्याचा आरोपही राणा यांनी केला आहे.

तर दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलं असल्याची जहरी टीका त्यांनी केली आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे फक्त बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडले ते ऐकण्यासाठी लोकं त्यांच्या सभेत आले होते. एकनाथ शिंदेच बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढं नेऊ शकतात. तर उद्धव ठाकरे यांचे संतुलन बिघडलं आहे. कारण सभेत उद्धव ठाकरे फक्त फिल्मचे डॉयलॉग सांगत होते अशी खिल्लीच नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंची उडवली आहे. अडीच वर्ष उद्धव ठाकरे घरात बसले होते त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं अशी टीकाही नवनीत राणा यांनी या वेळी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा