पोलीसांच्या फायरिंगमध्ये तरुणाच्या शरीरात घुसले ११ छर्रे, मराठा आंदोलनावेळची घटना

छत्रपती संभाजीनगर, ६ सप्टेंबर २०२३ : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीहल्ल्या केला. तसेच छर्रे फायरिंग केली. यामध्ये अनेक तरुण, तरुणी, महिला, पुरुष जखमी झाले आहेत. अंबड तालुक्यातील रेनापुरी येथील ३३ वर्षीय आकाश कवडे तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलीसांच्या फायरिंगमध्ये त्यांच्या शरीरात ११ छर्रे घुसले होते.

त्यांच्या शरीरातील ५ छर्रे स्थानिक रुग्णालयात काढण्यात आले होते. त्याला त्रास जाणवल्याने तो छत्रपती संभाजीनगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. तपासणी केल्या असता त्यांच्या खांद्यावर २ छर्रे, मनगडात १, छातीमध्ये १, उजव्या बगलेत २, तर कानाच्या वर डोक्यामध्ये १, असे ७ छर्रे असल्याचे निष्पन्न झाले. आज हे सर्व छर्रे ऑपरेशन करुन काढण्यात येणार असल्याचे आकाश कवडे यांनी सांगितले आहे.

आकाश कवडे कृषी पदविकाधारक असून तो वाडीगोद्री येथे खत, बी-बियाणे व औषधी दुकान चालवतो. लाठीहल्ला आणि दगडफेक यांच्याशी त्यांचा कोणताही संबंध नाही. नेहमीप्रमाणे तो संध्याकाळी दुकान बंद करून रेणापुरी गावाकडे दुचाकीवरून निघाला होता. अंतरवाली सराटी येथे आल्यावर अमानुष लाठीहल्ल्या सुरू होता. त्यावेळीच फायरिंग सुरू झाली आणि त्यात तो गंभीर जखमी झाला.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा