मुंबई, ७ ऑक्टोंबर २०२२ : राज्यात सत्तांतर नेमकं कसं आलं. शिंदे समर्थक आमदारांची जमवाजमव कधीपासून सुरु होती, यावर भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात एक मोठा गौप्यस्फोट केला. या वक्तव्यानं सत्तांतर नाट्यात भाजपची काय भूमिका होती, हे स्पष्ट होतंय. पण शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पूर्णपणे खोडून काढल आहे.
नेमकी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल काल पुण्यात पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेतील काही किस्से सांगितले.
दोन अडीच वर्षापासून आपलं सरकार येईल असे सांगत होतो. हे सांगायला मी काही वेडा नव्हतो. त्यासाठी योजना बनवत होतो, असे विधान पाटील यांनी यावेळी केलं आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कार्यकर्त्यांना विश्वास द्यायचा होता. ४० जणांना बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यासाठी वेळ लागणार होता. त्यासोबत तशी संधी येणेही महत्त्वाचे होते. शेवटी ती वेळ साधली गेली आणि आपले सरकार आणले, असा खुलासा भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
या वर दीपक केसरकर यांचे प्रत्युत्तर!
आम्ही अशा पद्धतीचे कोणतेही प्लॅनिंग केले नव्हते. आमचा उत्स्फूर्त उठाव होता. तो काही तत्त्वांसाठी होता. त्याबद्दल सविस्तर उल्लेख मी पत्रकार परिषदेत केला होता, असं वक्तव्य केसरकर यांनी केलं आहे. ३० जून रोजी आमदार घेऊन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना भाजपचं पाठबळ आहे, हे स्पष्ट होतं. मात्र आम्हीच हा उठाव केल्याचं वारंवार शिंदे गटाकडून सांगण्यात आलं. आमच्या पाठिशी मोठी अदृश्य शक्ती असल्याचं एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी सांगितलं होतं. त्यानंतर शिंदे गटातील प्रत्येक आमदारांनी आपल्या भागावर, महाविकास आघाडीतर्फे कसा अन्याय झाला, हे सांगितलं. त्यामुळे आम्ही हे बंड केल् आहे, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांनी दिल आहे.
विविध प्रसंगांनुसार, याच नेत्यांनी तसेच भाजपच्याही काही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून शिवसेनेतील या बंडामागे भाजपाचा हात असल्याचं उघड होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे