ठाकरेंना मत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत

14

मुंबई, १५ ऑक्टोंबर २०२२ : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला जमीन दाखवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांना मतदान करणं म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करण्यासारखं असल्याचा दावा केला आहे, उद्धव ठाकरे यांना मराठी आणि हिंदू मते मिळू नये म्हणून भाजपने नवीन खेळी सुरू केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी संवाद साधत असताना बोलतात की भाजपने वरळीवर अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या मानाने ठाकरे गटाकडून वरळीत कोणतेही कार्यक्रम घेतले जात नाहीत. त्यांना फार जनतेचं जनमत मिळत नाही. आदित्य ठाकरेंनी कार्यक्रम घेतला तर त्याला किती लोकं येतील याची त्यांना भीती आहे. हिंदूंचं मन तोडून त्यांनी व्यवहार सुरू केला आहे. आताही ते भारतजोडोत सहभागी आहेत. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्यासोबत बसलेले आहेत. त्यामुळे ते वरळीत कार्यक्रम घेण्यास धजावत नाहीत, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

तसेच ठाकरे गटाला मशाल मिळाली आहे. तर मशाल पंजाच्या हाती आहे. त्यांनी पंजाचा आणि घडीचा विचार स्वीकारला आहे. ही मशाल खूप काळ टिकणार नाही. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मत देणं आहे. हिंदुत्ववादी मराठी मतांचं मन दुखवणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक आहेत. त्यांना मतदान करायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मतदान करणं असा अर्थ होतो असे बावनकुळे म्हणाले आहेत.

तर अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरूद्ध भाजपचे मुरजी पटेल अशी लढत होणार आहे. तर या निवडणुकीतही भाजपच्या या खेळीचा प्रभाव होणार का याकडे लक्ष लागणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे