पुणे, १६ ऑक्टोंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी मात्र, सुळेंनी भाजपचं थेट नामकरण केलं आहे. भारतीय जनता पक्ष नाही तर भारतीय जनता लॉन्ड्री, असं नाव त्यांनी दिलं आहे. पुण्यातील उरुळी देवाची येथे जनसंवाद कार्यक्रमात बोलत असताना सुप्रिया सुळेनी भाजपला हा मिश्किल टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय म्हंटलं
सुप्रिया सुळे म्हणाल्या, की भारतीय जनता पार्टीत येणाऱ्या भ्रष्टाचारी लोकांना क्लीनचीट दिली जाते. म्हणून मी आता या पार्टीला भारतीय जनता लॉन्ड्री असंच नाव देते
तर आत्ता भाजप नेत्यांकडे बोलण्यासाठी काही उरले नाही, त्यामुळे त्यांची दडपशाही सुरू आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. भाजप आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉन्ड्री झाला आहे. ज्यांनी भाजपाला वाढवलं, संघटना मजबूत केली. अगदी माईक लावण्यापासूनची कामे ज्या कार्यकर्त्यांनी केली, ते कार्यकर्ते कुठे आहेत? असा खोचक सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना देखील खोचक टोला लगावला आहे, भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर आता मुळचे काँग्रेस-राष्ट्रवादीचेच नेते दिसतात. त्यांच्याकडे आता स्वतःचे नेते दिसतात कुठे? असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला आहे. पण त्यांच्या जागी आता आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये एवढा मान-सन्मान मिळत आहे, हे पाहून बरं वाटलं. असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे