हैद्राबाद, २१ ऑक्टोबर २०२२ : हैद्राबाद येथे तेलुगू सुपरस्टार नागार्जुन यांच्या हस्ते ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे तेलुगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आले. स्वतः छत्रपतींच्या चरीत्राने प्रभावित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समस्त तेलुगू बंधू भगिनींना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित हा चित्रपट पाहण्याचे आणि शिव विचार जाणून घेण्याचे आवाहन केले.
मराठीतील बहुचर्चित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड या पाच भाषांमधून २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चित्रपटात सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, हार्दिक जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.अलीकडेच या चित्रपटाच्या टीमने दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांची भेट घेतली. यावेळी टीमने नागार्जुन यांना सिंहासनारुढ शिवछत्रपतींची मूर्ती भेट म्हणून दिली.
सुबोध भावेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या भेटीविषयी सांगितले. नागार्जुन यांनी या चित्रपटाचे तेलुगू भाषेतील पोस्टर लाँच केले आहे. त्यांनी चित्रपटासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या व लवकरच “हर हर महादेव” चित्रपट तेलुगू भाषेत पाहणार असल्याचे सांगितले.
या चित्रपटात बाजीप्रभू देशांपेडेंची भूमिका वठवणारा अभिनेता शरद केळकर व अभिनेत्री सायली संजीव हिनेदेखील नागार्जुन यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे.