मुंबई, २१ ऑक्टोबर २०२२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या दीपोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांना पत्र लिहिले आहे. आणि मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे राज ठाकरेंच्या पत्रात..
माझ्या शिवाजी पार्क शेजाऱ्यांनो, तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो…
दिवाळी आली आणि दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळी पुन्हा एकदा नवा उत्साह, आनंद आणि नवी स्वप्नं घेऊन आली आहे. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई हे आपलं समीकरणं गेली १० वर्ष सुरू आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. गेली दोन वर्ष करोना असताना सुद्धा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.
दीपावलीच्या निमित्ताने आपण आपले घर, आपले अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादरमधील शिवतीर्थाचा परिसर हे मी माझ्या घराचे अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईने आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटते की प्रत्येकाने आपल्या घराबरोबर आपले अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला, तर महाराष्ट्र दृष्ट लागावी असा आणि जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.
आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन यावे. मित्र मंडळींना सांगावे. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका तो आनंदाचा सोहळा वाढत जावो. तुम्ही याच आणि इतरांनाही आवर्जून सांगा असे राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता यंदाच्या दिवाळीत इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मोर्चेबंदी करायला सुरुवात झाली आहे. त्यानुसार सर्वच राजकिय पक्षांनी दिवाळी पहाट, दीपोत्सव आणि कार्यक्रमांचे, विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा केलेले आहे. तसेच मतदारांबरोबर कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांंबरोबर गिफ्टची मेजवानीही यंदा जोरात दिसणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.