पणजी गोवा, २३ ऑक्टोबर २०२२ : ५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) २०२२ साठी निवडलेल्या चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘इंडियन पॅनोरमा’ फिचर फिल्म विभागात दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
मिळालेला हा बहुमान चित्रपटाचा नसून, छत्रपती शिवाजी महाराज यांची महती जगाला दाखवून देण्यासाठी ‘शिवराज अष्टक’ याचा जो यज्ञ दिग्पालने सुरु केला आहे त्याचा हा बहुमान आहे असे या निवडीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना चित्रपटाचे निर्माते–अभिनेते चिन्मय मांडलेकर म्हणाले. पुढे ते सांगतात की, ही निवड आमच्यासाठी खूप आश्वासक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हा चित्रपट आहे याचा आनंद जास्त आहे.
“गेल्या 6 वर्षांत कष्टाने केलेल्या ‘शिवराज अष्टक’ मालिकेला अव्याहतपणे प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय. इफ्फी सारख्या मानाच्या ठिकाणी ही निवड होणं आणि त्याचे स्क्रीनिंग ही आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे असे इफ्फी निवडीचा आनंद व्यक्त करताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले. आम्ही योग्य मार्गाने जातोय याची ही पोचपावती आहे असे ही ते म्हणाले.
‘अफझलखान वध’ हा शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय ‘शेर शिवराज’ चित्रपटातून मांडण्यात आला आहे. एकूण ३५४ भारतीय चित्रपटांपैकी निवडक अशा २५ फिल्म्स निवडण्यात आल्या आहेत. त्यात ‘शेर शिवराज’ चित्रपटाने बाजी मारली आहे. २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे